Saturday, 21 September 2013


आजचा सुविचार

 

  मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

 

  आजची बोधकथा

एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेंव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले. शेठजीने हे पाहून विचार केला कि हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच शेठजीने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला. 

तात्पर्य - जीवनात कधी कधी असेही होते कि आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेंव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते.

 

Friday, 20 September 2013

 

आजचा सुविचार

 

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

 

आजची बोधकथा

 

उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.

एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'

प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'

ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?

यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'

प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'

राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'

राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'

त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'

यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'

राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'

गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'

वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

 

Thursday, 19 September 2013

आजचा सुविचार

प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

आजची बोधकथा 

दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

तात्पर्य- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.

Tuesday, 17 September 2013

 

आजचा सुविचार


ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

 

आजची बोधकथा 


'नवा श्लोक ऎकविणार्‍या कवीला एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम' हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राम्हणाच्या कानी गेले. तो माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठया उत्साहाने आला.
परंतू राजधानी आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन, तो कालीदासाकडे गेला व त्याला म्हणाला, 'कवीराज ! मी भोजमहाराजांचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूनं, त्यांना ऎकविण्यासाठी एक श्लोक घेऊन मुद्दाम मणिपूरहून इथे आलो आहे. परंतू इथे आल्यावर मला असं कळल की, भोजराजांच्या राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला, तरी दरबारात असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवितो. त्याच्यानंतर द्विपाठी पंडित त्याचापुनरुच्चार करतो. शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखविल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात, 'ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील तीन पंडितांनी जसाच्या तशा म्हणून दाखविला, त्या अर्थी तो जुना आहे सिध्दच होते, ' तेव्हा कवीराज ! दरबारात नवा श्लोक घेऊन येणार्‍यांना असेच जर बनवून परत पाठविले जात असेल, तर मी तरी तिथे कशाला जाऊ?'
कालीदासाने त्या ब्राम्हणाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणॆ त्याने एक नवा श्लोक रचला व भोज राजाच्या दरबारात जाऊन ऎकविला. त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडिल अत्यंत दानशूर. अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला. त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून एक लाख सुवर्ण मोहोरा कर्जाऊ घेतल्या. परंतू कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यु आल्याने, भोज महाराज माझे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागतात.'
'हा श्लोक नविन नाही' असं म्हणावं, तर आपले वडिल या ब्राम्हणांच्या वडिलांचे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहोरा याला द्याव्या लागतील; त्यापेक्षा 'हा श्लोक एकदम नविन आहे.' असे म्हणणे पत्करले,' असा विचार करुन भोज राजाने त्या ब्राम्हणाचे नवीन श्लोक ऎकविल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन वाटेला लावले.

Monday, 16 September 2013

संगणकाधारित शिक्षण


शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षणाची अंमलबजावणी करताना राज्याने पुढील हेतू निश्चित केले आहेत.

 

  • शिक्षणाचा दर्जा सुधारणे.
  • गळतीचे प्रमाण घटविणे आणि धारकता वाढवणे.
  • शिक्षण आकर्षक आणि प्रभावी करणे.
  • शिक्षकांना प्रभावी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून सक्षम करणे.
  • चित्रे, चलतचित्रे, आवाजाच्या माध्यमातून संकल्पनांवर आधारित शैक्षणिक साहित्याचा डीजीटल वापर.
  • विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेणे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार


1.    मूळ संविधानात मोफत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा समावेश मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला होता. संविधानाच्या निर्मितीनंतर 10 वर्षांच्या आत शासन मोफत सक्तीच्या शिक्षणास मुलभूत अधिकाराचा दर्जा देईल अशी संविधानकर्त्यांची अपेक्षा होती.
2.    सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये जगण्याच्या मुलभूत अधिकाराचा (अनुच्छेद 21) विस्तार केला असून तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन केलेले आहे. प्राथमिक शिक्षणाशिवाय हा अधिकार अपूर्ण राहात असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले होते.
3.    2002मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाच्या अधिकाराला मुलभूत अधिकाराचा दर्जा प्राप्त झाला. मुलभूत अधिकार याचा अर्थ प्रत्येक भारतीयाला जन्मतः प्राप्त होणारे अधिकार, ते (घटनेचा संकोच केल्याशिवाय) संसदेला, विधिमंडळाला, केंद्र किंवा राज्य शासनाला हिरावून घेता येत नाहीत.
4.    या घटनादुरुस्तीमुळे देशातील 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. येथे शिक्षण बालकांसाठी `मोफत' शासनासाठी शिक्षण देण्याची `सक्ती', असे अभिप्रेत आहे. याशिवाय 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीही मार्गदर्शक तत्वांद्वारे शासनावर आली आहे.
5.    घटना दुरुस्तीने बहाल केलेला हा अधिकार प्रत्यक्षात अंमलात आणता यावा यासाठी केंद्राने  `बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, 2009'मध्ये पारित केला. घटना दुरुस्ती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी दिनांक 1 एप्रिल 2010 रोजी कायदा देशभरात लागू झाला.
6.    मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊ शकणाऱया, इंटरनॅशनल स्कूल, आयसीएसई काऊन्सिल, सीबीएसई बोर्ड, प्रायोगिक शाळा किंवा खाजगी शाळा असे पर्याय असणाऱया पालकांकडे या कायद्याने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करायचा किंवा नाही याचा पर्याय आहे. हा कायदा खरे तर जे आजपर्यंत शिक्षणाच्या कक्षेत येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आहे. ज्यांची पहिली पिढी शिकतेय अशा आदिवासींसाठी, भटक्या-विमुक्तांसाठी, स्थलांतर करणाऱया ऊसतोडणी अथवा बांधकाम मजुरांसाठी, अपंगांसाठी, बालकामगारांसाठी आणि आर्थिक-सामाजिक विषमतेचे बळी ठरलेल्या लाखोंसाठी हा कायदा आहे
  7.  मोफत प्राथमिक शिक्षण, शासनावर शिक्षण देण्याची सक्ती, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या   प्रवाहात   येण्याची संधी, ठरावीक परिसरात शाळेची उपलब्धता, जन्म दाखला नसल्याच्या कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही, शाळांना डोनेशन घेता येणार नाही, वर्षभरात कधीही शाळेत दाखल होण्याची संधी, मुलांचा शारीरिक मानसिक छळ करण्यास शाळांना मज्जाव, पालकांचा सहभाग असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निर्मिती अशा अनेक चांगल्या तरतुदी या कायद्यात आहेत.

Sunday, 15 September 2013

केंद्र मार्डी तालुका माण  जिल्हा सातारा आपले सहर्ष स्वागत करत आहे …