चला सोडवा गणितं…
1)
एका डझनात बारा गोड गोड केळी असतात. चुन्नू, मुन्नू खेळून घरी आल्यावर
आईने त्यांना एक एक केळे खायला दिले, आणि नंतर स्वत:ही एक केळे खाल्ले. तर
सांगा पाहू किती केळी शिल्लक राहिली?
2)
फुलबागेतल्या एका झाडाला तीन फांद्या होत्या. प्रत्येक फांदीवर दोन फुले
फुलली होती. प्रत्येक फुलाला तीन पाकळया असतील, तर सांगा पाहू एकुण किती
पाकळया असतील?
3)
केळेवाल्याला वीस रुपयांची नोट दिली. त्याने अठरा रुपये परत दिले, आणि
पिवळी रसरशीत सहा केळी दिली. तर एका रुपयात किती केळी मिळतील ते चटकन
सांगा.
4)
बाबाजींकडे करडया रंगाची एक बकरी होती. ती रोज दोन टोपल्या चारा खायची.
सात दिवसांचा चारा विकत घ्यायला बाबाजी गेले तर किती टोपल्या चारा त्यांना
विकत घ्यायला लागेल?
5)
घडयाळात नऊ टोले पडतात तेव्हा ताई अभ्यासाला बसते. घडयाळात दहा टोले पडतात
तेव्हा बाबा ऑफिसात जातात. घडयाळात अकरा टोले पडतात तेव्हा दादा शाळेत
जायला निघतो. घडयाळात बारा टोले पडतात तेव्हा आजीची झोपायची वेळ होते.
पुढच्या तासाला घडयाळात किती टोले पडतील?
6)
पिंटूने वाढदिवसाला केक कापला. भल्यामोठया केकचे दहा भाग केले,
प्रत्येकाला एक एक भाग दिला, तरी चार भाग उरले, तर वाढदिवसाला घरात किती
माणसे होती?
7) आगगाडीच्या प्रत्येक डब्याला आठ चाके, सहा डब्यांची आगगाडी. तिला दहा चाकांचे इंजिन होते. तर इंजिनासकट गाडीला एकुण चाके किती?
8) एक टॉवेल, दोन कुडते असे कपडे धुवायला धोबीकाका घेऊन गेले. प्रत्येक कपडयाला दोन रुपये याप्रमाणे धोबीकाकांना किती पैसे मिळतील?
9) एका वर्गात चाळीस जण आणि त्यांच्या बाई. चाळीस जणांत आठ मुली तर वर्गात मुले किती?
10)
महिन्यातील तीसही दिवस पप्पूने पिगीबॅन्कमध्ये पैसे टाकले. पहिले आठ दिवस
रुपया, रुपया टाकला तर उरलेले दिवस रोज पन्नास पैशांचे नाणे टाकले. तर
महिनाअखेर किती रुपये त्याच्या पिगीपबॅन्केत जमले?
11)
चार वाजता गावाहून आजी आली. पाच वाजेपर्यंत आम्ही तिच्या गोष्टी ऐकल्या.
सात वाजेपर्यंत आईशी गप्पा मारत आजी जेवली. आठ वाजताच्या गाडीने आजी परत
निघाली, तर आम्हाला आजीबरोबर किती वेळ घालवता आला?
12)
बाबांनी नवे कॅलेंडर आणले. त्यात एक मोठीच गडबड होती. त्यात सप्टेंबर
महिनाच छापला गेला नव्हता. मग त्यापुढचे कोणते महिने असतील जे बरोबर छापले
गेले होते. या महिन्यांत अजिबात घाम येत नाही हे बरोबर आहे का?
13)
आईने सकाळच्या न्याहरीसाठी चार साखरपोळया केल्या होत्या. घरी असलेल्या
सगळयांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली. सगळया पोळया संपल्या, तर घरात किती
माणसे असतील सांगा पाहू.
14) चार दिवसांत पाऊस पडला सोळा सेंटीमीटर. पहिल्या तीन दिवसांत पडला रोज दोन सेंटीमीटर. तर चौथ्या दिवशी किती पाऊस पडला?
15)
पाचवीच्या वर्गात एकुण वीस मुली. त्यातल्या चार मुली हिरव्या रिबीनी
डोक्याला बांधतात. उरलेल्या मुलींपैकी अर्ध्या जणी लाल रिबीनी डोक्याला
बांधतात, तर किती मुली लाल रिबीनी बांधतात?
16)
सोमवारी रात्री आजी आजोबांबरोबर आम्ही आगगाडीत बसलो, ते गुरुवारी सकाळी
गावी पोहोचलो. ज्या दोन दिवसांत आम्ही आगगाडीत धमाल केली त्या दिवसांची
नावे तुम्हाला सांगता येतील का?
17)
आईने सकाळी दोन लीटर दुध खरेदी केले होते. त्यातले अर्धा लीटर दूध आम्ही
मुलांनी पिऊन टाकले. एक लीटर दुधाची आईने दुपारी खीर केली, तर किती दूध
शिल्लक राहिले?
18)
दहा मीटर लांबीचे कापड आणले. शिंपीदादांनी एक एक मीटर लांबीचा एक असे
त्याचे दहा तुकडे केले. आता सांगा असे की शिंपीदादांनी कात्रीने कापड किती
वेळा कापले?