Monday 19 May 2014

मी एक शिक्षक...



     आई मला नेहमी म्हणायची की कमी पैशाची का असेना पण तू सरकारी नोकरी करावी याला दोन करणे होती ती म्हणजे एक तर आमची गरीब परिस्थिती आणि दुसरी म्हणजे तिची अशी धारणा होती की एकदा सरकारी नोकरी लागली की परत कोणी म्हणून कोणी सुधा नोकरीवरून काढून टाकत नाही..... मग सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे लवकरात लवकर आणि सहजासहजी मिळणारी नोकरी म्हणजे शिक्षकाची नोकरी मला डोळ्यासमोर दिसू लागली... बारावी मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आणि डी.एड. करायचे असा मी निश्चय केला आणि इयत्ता सातवीमध्ये असतानाच मनाशी पक्के ठरवले की वाणिज्य शाखेतून अकरावी आणि बारावी करायचे चांगले मार्क्स मिळवायचे आणि डी. एड. करायचे..... आणि शिक्षक व्हायचे.... कारण त्यावेळी असे समजले जायचे की एकदा का डी. एड. ला एडमिशन मिळाले की तो शिक्षक झालाच म्हणून समजा..... कारण डी. एड. ला सहसा कोणी नापास होत नसे.... माझा निर्धार पक्का झाला होता मी डी.एड. करून शिक्षक होण्याचे निश्चीत केले होते....
     दहावीला मला ८० टक्के मार्क्स मिळाले आणि सर्वांचे सल्ले सुरु झाले.... सायन्स घे.... इंजिनियरिगला जा.... मेडिकलला जा... हुशार आहेस..... डी. एड. करू नकोस.... आम्ही मदत करू.... कोणीही डोनर मिळतील.... काही अडचण येणार नाही.... एवढ्या टक्केवारीच्या मुलांनी डी. एड. करू नये... असे एक न एक अनेक सल्ले मिळत होते.... कोणी प्रेमापोटी सांगत होते...
कोणी तळमळीने सांगत होते... तर कोणाला मी शिक्षक होऊ नये म्हणून असे वाटत होते... अर्थात ते सर्वजन चुकीचे सांगत नव्हते हे मला पटत नव्हते असे नाही पण मला सरकारी नोकरी करायची होती.... मग सरकारी नोकर्या इतरही अनेक आहेत त्या पाहाव्या एम. पी. एस. सी. किंवा यु. पी. एस. सी. करावे असेही काहींचे मत होते.... माझा सगळा गोंधळ होत होता... 

     अशा परीस्थित मी वडिलांना विचारले की काय करावे... वडिलांनी मला सांगितले की सर्वजण काय म्हणतात यापेक्षा तुला काय वाटते हे फार महत्वाचे आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते प्रत्येक काम आपापल्या जागेवर सारखेच महत्वाचे असते. आपण त्या कामाला न्याय दिला पाहिजे बस... आपण ते काम कशा पद्धतीने करतो हे फार महत्वाचे असते. तू कोणतेही काम कर पण असे कर की ते काम कोणाला कमी महत्वाचे वाटू नये. ते काम असे कर की तुझी एक वेगळी छाप वेगळी ओळख निर्माण व्हावी.... 

     या माझ्या वडिलांच्या जीवनाविषयी आणि कामाविषयी च्या तत्वज्ञानाने माझा निर्धार अधिकच पक्का झाला आता मला खरे बळ मिळाले होते आणि मी शिक्षक होण्यासाठी तयार झालो होतो....
     ठरल्याप्रमाणे मी वाणिज्य शाखेला एडमिशन घेतले अकरावी, बारावी केले बारावीला ८१.५० टक्के मिळवून पास झालो आणि डी.एड. ला एडमिशन घेऊन दोन वर्षात तिथेही चांगल्या मार्कांनी (६८ टक्के) पास झालो आणि शिक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये एका छोट्याश्या खेड्यात द्विशिक्षकी शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालो... मी आईची सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण केली याचे समाधान मला लाभले होते पण वडिलांचे शब्द आजही कानात घुमत होते... काम असे कर की तिथे तुझी छाप असावी .....

     मी शाळेमध्ये शालेय कामकाजास सुरुवात केली होती... आणि शाळेच्या तिसर्याच दिवशी एका माझ्या हितचिंतकांनी मला सांगितले की सर तुम्ही हुशार आहात... अकटीव्ह आहात... साहेबांची फार कामे करू नका नाहीतर तुमच्याच मागे सर्व कामे लागतील.... साहेब सर्व कामे तुम्हालाच सांगतील... सरकारी काम करत असताना येड्याचे सोंग घ्यायचे असते... साहेबांनी काम सांगितले तर मला हे येत नाही असे म्हणायचे नाहीतर आपल्याला ते जमणार नाही असे सांगायचे किंवा काम चुकवून ठेवायचे.... मग साहेब परत काम सांगत नाहीत... कोणी सांगितलेय त्यांची फुकटची कामे करायला... मी त्या माझ्या हितचिंतकांना अतिशय नम्रपणे सांगितले की मी येथे काम करायलाच आलो आहे... आणि माझ्या वरिष्टांनी सांगितलेली सर्व कामे करणे माझे कर्तव्य आहे तेव्हा त्यांचे काम केलेच पाहिजे आणि काम केल्याने आपलाच अनुभव वाढतो न.. नवीन दोन गोष्टी शिकायला मिळतात न... आणि आपण महिन्याला पगार घेतो म्हटल्यावर त्याला फुकटची कामे कशी म्हणता येतील... वरिष्टांनी आपल्याला ऑफिसची कामे सांगणे हे काही कमीपणाचे लक्षण नाही अर्थात आपले काम सांभाळून मी शक्य होईल तेवढे सर्व काम करण्याचा मनापासून प्रयत्न करीन....
     मी माझे शालेय कामकाज करून होईल तेवढी मदत केंद्रप्रमुख साहेबाना करू लागलो... केंद्रातील सर्व शाळांच्या माहित्या गोळा करणे... एकत्रीकरण करणे... रेकोर्ड ठेवणे अशी अनेक कामे करून होईल तेवढी मदत मी साहेबांना करू लागलो... साहेब देखिल माझ्या कामावर खुश होते कारण त्यांना केलेल्या मदतीच्या कामाचा माझ्या शालेय कामावर मी काही परिणाम होऊ देत नसे माझे सर्व शालेय कामकाज करून मी साहेबाना मदत करत होतो त्यामुळे साहेबांना माझा अभिमान वाटू लागला... आणि एक दिवस आमचे केंद्रप्रमुख साहेब सेवानिवृत्त झाले... त्यांच्या निरोपसमारंभाच्या दिवशीच गटशिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितले की नवीन केंद्रप्रमुख नियुक्ती होईपर्यंत या केंद्राचे काम तू पहायचे.... माझ्या शाळेचे सर्व शैक्षणिक कामकाज पाहून केंद्रप्रमुखांचे काम पाहणे हि जबाबदारी म्हणावी तेव्हडी सोपी नव्हती...
     पंचायत समितीमध्ये मिटींगला जाणे तेथे ज्या माहित्या असतील त्या लिहून घेणे.... केंद्रशाळेत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांची मिटिंग लावणे... त्यांना त्या महित्यांचे नमुने लिहून देणे... परत एकदा त्यांची मिटिंग लावून त्या माहित्य गोळा करणे... त्या सर्व माहित्यांची एकवट करणे... पंचायत समितीत माहिती नेऊन देणे... अश्या पद्धतीने कामकाज सुरु झाले... हे काम फारच वेळखाऊ आहे असे माझ्या लक्षात आल्यामुळे मी फोन चा प्रभावी वापर करण्याचे ठरवले आणि महित्यांचे नमुने फोनवर मेसेज करून मिटींगला येतानाच माहित्या घेऊन या असे सांगू लागलो... त्यामुळे मुख्याध्यापकांची एक चक्कर वाचली... आणि मी सर्व महित्यांची एकवट करून पंचायत समितीच्या मेल आयडी वर मेल करू लागलो त्यामुळे माझी पंचायत समितीमधील एक चक्कर वाचली... या कालावधीत माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे यातील काही माहित्या या पूर्वीच्या काही महित्यांवरच अवलंबून आहेत तर काही माहित्या परत परत मागवल्या जातात तसेच बर्याचश्या माहित्या या ३० सप्टेंबर ला गृहीत धरून असतात.... आणि मग मी ब्लॉगचा प्रभावी वापर करण्याचे ठरवले मी एक शैक्षणिक ब्लॉग
(अर्थात आमच्या केंद्रापुरता मर्यादित) तयार केला या कामासाठी यशदामध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा फार उपयोग झाला. मी ३० सप्टेंबरला गृहीत धरून केंद्राच्या सर्व माहित्या तयार करून crcmardicrcmardi.blogspot.in  या ब्लॉगवर अपलोड केल्या नवीन सर्व माहित्या माझ्या मेलवर पंचायत समितीतून घेऊ लागलो आणि त्या तयार करून ब्लॉगवर अपलोड करू लागलो... यामुळे मला माझे काम सोपे करता आले आणि मागच्या सर्व माहित्याही ब्लॉगवर राहू लागल्या त्यामुळे त्यांच्या आधाराने नवीन माहिती करणे सोपे झाले त्याचबरोबर मी ब्लॉगवर अनेक उपयोगी असे उपक्रम चालू केले ज्याचा फायदा केंद्रातील आणि तालुक्यातील शिक्षकांना झाला नवनवीन अपडेट शिक्षकांना त्वरित मिळू लागले... त्यामुळे शिक्षकांना,
मला आपले काम सोपे करण्यासाठी ब्लॉगचा खूप फायदा होऊ लागला...
     आपल्या केंद्राची वेबसाईट सुरु झाली आहे... आपल्या केंद्रातील शाळा इंटरनेटवर दिसत आहेत म्हणून केंद्रातील शिक्षक व शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक शाळामध्ये अनेक कर्यक्रम व नवनवीन उपक्रम सुरु झाले जेणेकरून आपली शाळा नेटवर दिसेल...
     ब्लॉगचे अनेक उपयोग होऊ लागले. सर्व शिक्षकांनी चांगले इंटरनेट चालणारे मोबाईल विकत घेतले... इंटरनेट ची माहिती करून घेतली... केंद्राचा ब्लॉग रोज उघडून पाहू लागले... रोजच्या रोज सुविचार, दिनविशेष, बोधकथा, इत्यादी माहित्या ब्लॉगवरून घेऊन आपल्या आपल्या शाळेतील दैनदिन कामकाजात त्याचा वापर करू लागले... रोजच्या रोज कितीतरी नवीन गोष्टी या ब्लॉगवरून सर्वाना मिळू लागल्या...
     हळू हळू या ब्लॉगची माहिती केंद्राबाहेर आणि तालुक्याबाहेर पसरली जिल्ह्यातील आणि जील्ह्याबाहेरील देखील शिक्षक या ब्लॉगचा वापर त्यांच्या दैनदिन कामकाजासाठी आणि अध्यापनासाठी करू लागले अल्पावधीत या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळून त्याच्या ४०,००० च्या वर व्हीझीटस झाल्या या ब्लॉगला वाढता प्रतिसाद पाहून Flipkart या ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीने crcmardicrcmardi.blogspot.in ला Affiliat Partnar करून घेतले आहे... या कामी अमोल आमटे या दिल्लीस्थित सदगृहस्थाची खूप मदत झाली. म्हणजेच या ब्लॉगच्या लिंकवरून जर कोणी ऑनलाईन खरेदी केली तर त्यांना मिळणाऱ्या रकमेतील काही हिस्सा ते मला देणार आहेत म्हणजे या ब्लॉगमधून आता मला पैसेही मिळणार आहेत ज्याचा वापर मी गरीब मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी करणार आहे...
     मी माझे काम करत आहे... प्रामाणिकपणे आणि पूर्ण जीव लावून... आणि यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठीची मिटिंग घेण्यात आली तेव्हा सर्व शिक्षकांनी एकमुखाने या वर्षीचा आदर्श शिक्षक राम सालगुडे सर असे सांगितल्याचे ज्यावेळी मला कळले त्यावेळी मी खूप विरोध केला मला पुरस्कार देऊन खूप मोठे करू नका असे मी सांगत होतो; पण माझे कोणी ऐकत नव्हते शेवटी सर्वांनी मिळून मला या वर्षीचा  तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्यास भाग पाडले... 
     नोकरीच्या सातव्या वर्षी मी तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार घेतला म्हणजे मी खूप मोठे काम केले आहे असे नसून मला अधिकाधिक चांगले काम करण्यासाठीची प्रेरणा म्हणून हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे... आणि समाधान आहे की वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी हाती घेतलेले काम चांगल्या पद्धतीने करत आहे...
     पण ही फक्त एक सुरुवात आहे अजून बरेच काही करायचे आहे आणि शिक्षकी पेशाला अधिकाधिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे.... अगदी शेवटपर्यंत....

6 comments:

  1. राम सालगुडे ''गुरूजी ''

    आपल्या अभिमानास्पद कार्याबद्दल अधिक काय बोलावे.?

    केवळ एवढेच की-

    ' आपल्या सारख्या समाजशिक्षकाची या जि.प. शाळेलाच नाही तर संपूर्ण देशाला गरज आहे...आधुनिक भारत घडवण्यासाठी! '

    धन्यवाद.

    खुप कौतूकासोबत खुप शुभेच्छा. ..


    आपला सहकारी

    मांदळे म.प्र.
    उपशिक्षक, शाळा निवंगण.
    ता.भोर . जि.पुणे.

    ReplyDelete
  2. मांदळे सर आपण फारच स्तुती केलीत... अजून बरेच काही करायचे आहे... आपली योग्य ती साथ मिळेल अशी अपेक्षा करतो...

    ReplyDelete
  3. very nice. best of luck...!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सोमेश सर
      अजून बरेच काही करायचे आहे... आपली योग्य ती साथ मिळेल अशी अपेक्षा करतो...

      Delete
  4. सर ब्लॉग कसा तयार करायचा याविषयी मार्गदर्शन करावे .my email id rameshwagh10@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. वाघ सर शैक्षणिक ब्लॉग कसा करायचा याविषयी एक लेखमाला या ब्लॉगवर मी लवकरच प्रसिद्ध करत आहे त्यामुळे या ब्लोगला भेट देत राहा
      http://crcmardi.blogspot.in

      Delete