Tuesday, 17 December 2013

सुविचार व बोधकथा

आजचा सुविचार
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
आजची बोधकथा
संत रज्जब नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असत. ना कधी वाईट वागत न वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत, सदाचरणाबद्दल सांगत, प्रेमळ व गोड वाणीने बोलत. रज्जब आपल्या गावातील लोकांचे श्रद्धाकेंद्र बनले होते. गावातील लोक त्यांचे विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरण करत असत. एकेदिवशी परगावचा जुबेर नावाचा एक तरुण त्या गावात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम तर मिळाले परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देत असे. यामुळे एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला, लोकांना खूप काही बोलला आणि तोल ना सावरता आल्याने तो गटारीत जावून पडला. लोकांना वाईटसाईट बोलल्याने त्याला कुणी गटारीतून काढण्यास पुढे आले नाही. त्याचवेळी रज्जब तिथे आले. त्यांनी त्याला उचलले, त्याचे तोंड धुतले आणि जुबेरला म्हणाले,"अरे मित्रा! ज्या तोंडातून तू देवाचे नाव घेतले पाहिजे त्या तोंडातून दारू पितो आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसाना शिव्या देतो हे चांगले नाही. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी जुबेर कुठे शुद्धीत होता. त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितले तेंव्हा तो स्वत:बद्दल जास्त वाईट वाटले. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा जुबेरवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला कि ज्या तोंडाला संतानी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाहीत. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला. 
तात्पर्य-
संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगले असते, फक्त त्यानुसार आचरण करणे हे आपल्या हातात आहे. चांगले आचरण हि माणसाची ओळख आहे.

No comments:

Post a Comment