Tuesday, 3 December 2013


आजचा सुविचार

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

आजची बोधकथा
एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?"
राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.
तात्पर्य
दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.


1 comment: