Sunday, 10 November 2013

तंत्रज्ञान-प्रगतीचे एक पाऊल पुढे ! (अजय लेले) 

 मंगळ मोहिमेच्या निमित्तानं भारतीय शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना नव्यानं बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. या मोहिमेसाठी विकसित केलेल्या किंवा तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला नागरी, व्यापारी आणि लष्करी क्षेत्रातही करता येण्यासारखा आहे. 
भारतानं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आखलेल्या पहिल्या मंगळमोहिमेच्या अवकाशयान प्रक्षेपणाचं सर्व जग साक्षीदार ठरलं. या यशस्वी प्रक्षेपणामुळं या मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला आहे. अवकाशयानाला मंगळाच्या कक्षेत पोचण्यास आणि निरीक्षणं घेण्याची सुरवात करण्यास अद्याप 300 दिवसांचा अवधी असल्यानं ही मोहीम यशस्वी झाली, असं आत्ताच म्हणता येणार नाही. तरीही, हा पहिला अडथळा पार केल्याबद्दल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशासाठी एवढं मोठं स्वप्न पाहिल्याबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं (इस्रो) अभिनंदन करायलाच हवं. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं परिश्रमयुक्त नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी पाहता ही मोहीम यशस्वी होणं, ही फक्त आता वेळेची बाब आहे, याबद्दल भारतीयांच्या मनात शंका नाहीत.
या टप्प्यावर या मंगळमोहिमेचा आणि जो व्यापक दृष्टिकोन ठेवून यासाठी इतका खर्च केला त्याचा भारताला काय उपयोग, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तांत्रिक, वैज्ञानिक आणि भूराजकीय दृष्टिकोनातून या मोहिमेचं मूल्यमापन करता येईल. प्रचंड लांबवरचा प्रवास करणं आणि नंतर मंगळाच्या कक्षेत स्थिरावणं, हे मोठं तांत्रिक आव्हान आहे. तब्बल 300 दिवस अवकाशयानाला अनपेक्षित किरणोत्सर्गाच्या आव्हानाला तोंड देत मार्गक्रमण करायचं आहे. शिवाय, मंगळाच्या कक्षेत पोचल्यावर योग्य पद्धतीनं कार्यरत व्हायचं आहे. अवकाशयानाच्या स्थितीकडं काळजीपूर्वक लक्ष देणं आणि त्याच्या कायम संपर्कात राहणं, हे पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षालाही आव्हानच आहे. अवकाशयान मंगळाच्या कक्षेत स्थिरावल्यावर पृथ्वीवरून यानाकडं आणि तिथून पुन्हा पृथ्वीकडं संदेश येण्यास 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या मर्यादेवर उत्तर म्हणून अवकाशयान स्वत:च निर्णय घेऊ शकेल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या निमित्तानं भारतीय शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना खूप तंत्रज्ञान शिकता आलं. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या प्रकारे विकसित केलेल्या किंवा तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला नागरी, व्यापारी आणि लष्करी क्षेत्रातही करता येण्यासारखा आहे, हे कौतुकास्पद आहे. प्रवासादरम्यान आणि मंगळाच्या कक्षेत पोचल्यावर अत्युच्च तापमान, गुरुत्वाकर्षणात सातत्यानं होणारा बदल, किरणोत्सर्ग आणि सौरमालेतल्या इतर घटनांच्या आव्हानासमोर टिकण्याकरिता अवकाशयान तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या निर्मितीसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय संपर्कयंत्रणा, मोबाईल प्लॅटफॉर्मवरून संपर्कयंत्रणेचं व्यवस्थापन (यासाठी पॅसिफिक महासागरात दोन जहाजं तैनात करण्यात आली आहेत), कृत्रिम बुद्धिमत्ता (स्वत:चे निर्णय घेण्याची अवकाशयानाची क्षमता), रोबोटिक्‍स आणि इतर काही तंत्रज्ञानाचा विकास यानिमित्तानं करण्यात आला आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा इतर क्षेत्रांतही उपयोग करता येण्यासारखा आहे.

मंगळाच्या पृष्ठभागाची आणि ग्रहाभोवतीच्या वातावरणाची जास्तीत जास्त माहिती गोळा करणं, हा या मोहिमेमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्दिष्ट आहे. मंगळावर मिथेन वायूचं अस्तित्व आहे की नाही, हे ओळखण्यासाठी अवकाशयानामध्ये विशिष्ट सेन्सर यंत्रणा बसवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावरच मंगळावरच्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाबाबत निश्‍चित काही सांगता येणार आहे. या सेन्सरद्वारे मिळणाऱ्या माहितीबाबत जगातल्या सर्व शास्त्रज्ञांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नॅनो टेक्‍नॉलॉजी, ऑप्टिकल टेक्‍नॉलॉजी आणि थर्मल टेक्‍नॉलॉजी यांच्यासह विविध सेन्सर विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेन्सर विकसित करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान काही अतिरिक्त विविध सेन्सरचीही निर्मिती झाली आहे. या सर्व प्रक्रियेमुळं सध्या असलेल्या तंत्रज्ञानाबद्दलच्या ज्ञानात मोलाची भर पडणार आहे.
या मोहिमेचं भूराजकीय महत्त्व उघड झालेलं नाही; तरीही ही मोहीम यशस्वी होणं, हाच भारताच्या उच्च तांत्रिक क्षमतेचा पुरावा ठरणार आहे. 1970 पासून 2010 पर्यंत अणुधोरणामुळं भारताच्या तंत्रज्ञान-आयातीवर निर्बंध लादण्यात आले होते आणि त्यामुळं तंत्रज्ञानाबद्दलच्या बहिष्काराला ज्या भारताला सामोरं जावं लागलं होतं; त्याच भारतानं ही तांत्रिकक्षमता स्वत:च प्राप्त केली, ही बाब अभिमानास्पद आहे. भारताचा अवकाश कार्यक्रम हा जगातल्या कमी खर्चिक अवकाश कार्यक्रमांपैकी एक आहे. वास्तवात तुलना केल्यास, मुंबईतल्या मलबार हिल परिसरातल्या एका आलिशान बंगल्याच्या किमतीएवढाच खर्च या मोहिमेला लागला आहे!
"मंगळमोहीम' म्हणजे "रात्री झोपेत सोन्याचा साठा दिसला आणि पडझड झालेल्या किल्ल्यात खजिन्याचा शोध सुरू झाला,' असा प्रकार नाही. आपल्या शेजारच्या ग्रहावर काय आहे, हे अधिक प्रमाणात जाणून घेण्याची ही एक आस आहे. मंगळावरचं "वातावरण' नाहीसं का झालं आणि कधीकाळी किंवा सध्याही तिथं जीवसृष्टी असेल तर तिचं काय, या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठीचा प्रयत्न म्हणून ही मोहीम आहे. भविष्यात मंगळावर वसाहत शक्‍य आहे काय, हेही पडताळून पाहायचं आहे. पृथ्वीची अवस्था सध्याच्या मंगळासारखी होण्याची शक्‍यताही तपासायची आहे. या मोहिमेचं प्रत्येक उद्दिष्ट भविष्यात होऊ शकणाऱ्या फायद्याशीच निगडित आहे. या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यास आत्तापासूनच सुरवात केली नाही, तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या भल्यासाठी आपल्या या मोहिमेच्या अनुभवातून शिकणं अवघड होईल; त्यामुळं आत्ताच सुरवात करणं आवश्‍यक आहे. कारण, आपण पुढच्या पिढ्यांचंही काही देणं लागतो! 

(लेखक दिल्लीस्थित संरक्षण विश्‍लेषक व "मिशन मार्स : इंडियाज्‌ क्वेस्ट फॉर रेड प्लॅनेट' या पुस्तकाचे लेखक आहेत.)