Wednesday, 18 June 2014

आजचा दिनविशेष

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन १८५८

राणी लक्ष्मीबाई
टोपणनाव: मनू
जन्म: नोव्हेंबर १९, इ.स.१८३५
काशी, भारत
मृत्यू: जून १८, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर
धर्म: हिंदू
वडील: मोरोपंत तांबे
आई: भागीरथीबाई तांबे
पती: गंगाधरराव नेवाळकर


चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागिरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ ला यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी आपल्या कन्येचे नाव 'मनुताई' असे ठेवले. लहानपणापासून हुशार व देखणी होती. मनू पाच वर्षांची असतानाच तिच्यावरचे मातृछत्र हरपले.

हुशार असलेल्या मनुताईला दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी हेरले. ब्रह्मावर्त येथील वाड्यात नानासाहेब पेशवे व रावसाहेब यांच्यासह चिमुकल्या मनुताईने तलवार, दांडपट्टा व बंदुक चालवणे तसेच घोडदौडीचे शिक्षण घेतले. युध्दातील डावपेच लक्षात घेऊन मनुताईने मोडी लिपीतील पुरेसे शिक्षणही घेतले.

वयाच्या सातव्या वर्षीच मनुताई झाशी संस्थानचे अधिपती यांच्याशी विवाहबध्द झाली. विवाहपश्चात मोरोपंताच्या मनुताईला 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' म्हणून संबोधले जाऊ लागले. विवाहानंतरचा काही काळ मजेत गेल्यानंतर लक्ष्मीबाईच्या संघर्षाला खरी सुरवात झाली. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु ,अवघ्या तीन महिन्यातच काळाने त्याच्यावर झळप घालून त्यांच्यापासून ते हिरावून नेले. त्यानंतर पुत्रवियोगाचा धक्का सहन न करू शकलेले गंगाधररावही काही दिवसातच चालते झाले.

राणी लक्ष्मीबाईंवरील कौटुंबिक संकटाची मालिका संपत नाही तोच 1854 मध्ये ब्रिटिशांनी झाशीचे संस्थान खालसा करून टाकले. झाशी खालसा झाल्याचे वृत्त ऐकताच राणी लक्ष्मीबाई चवताळल्या. त्यात ब्रिटिश अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्यावेळी संतापलेल्या झाशीच्या वाघिणीने एलिसवर 'मेरी झाशी नही दूँगी!', अशी डरकाळी फोडली.

इंग्रजांच्या संस्थाने बरखास्त करून भारत घशात घालण्याच्या उपक्रमाला १८५७ च्या उठावाच्या रूपाने विरोध सुरू झाला. या स्वातंत्र्यसंग्रामात दिल्ली, बरेली पाठोपाठ झाशीही पेटले. मोठ्या कोशल्याने राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडविले. झाशी स्वतंत्र झाली. त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली. लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक ब्रिटिशांनी केली. सर ह्यू रोज यांनी आपल्या सैन्यासह झाशीवर हल्ला करण्यासाठी तळ ठोकला. परंतु वीरांगना लक्ष्मीबाई या स्वत: झाशीच्या तटावर उभे राहून सैन्याला लढण्यास स्फूर्ती देत होत्या. लढाई सुरू होऊन तीन दिवस उलटूनही झाशीवर विजय मिळवता येत नसल्याने ह्यू रोजने फितुरी करून झाशीत प्रवेश केला. झाशीतील नागरिकांची इंग्रजांनी लुट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी शत्रूची फळी तोडून पेशव्यांच्या सान्निध्यात गेल्या. मोचक्याच सेन्यासोबत अवघ्या १२ वर्षांच्या आपल्या मुलास पाठीशी बांधून राणी लक्ष्मीबाई किल्ल्याबाहेर पडल्या.

ग्वाल्हेरकडे सर ह्यू रोजने आपल्या सैन्याचा मोर्चा वळवला. आता रोजशी दोन हात करण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्याच्या मदतीने रोजविरूध्द युध्द फुकारून ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वत: लक्ष्मीबाई यांनी स्वीकारली. युध्दातील लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमी शौर्यापुढे ब्रिटिश हताश होऊन माघारी परतले. परंतु, १८ जूनला ब्रिटिशांनी ग्वाल्हेरवर चहूबाजूंनी अचानक हल्ला केला. तेव्हाही त्या इंग्रजांना शरण गेल्या नाहीत. शत्रूची फळी फोडून बाहेर जात असतानाच त्यांच्या मार्गात एक ओढा आडवा आला. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे त्यांचा 'राजरत्‍न' घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्याजवळच गरगरू लागला. ओढ्यापाशी राणी लक्ष्मीबाईला इंग्रजांनी घेरले. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु, उपचार न करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी वीरमरण स्वीकारले.
         

No comments:

Post a Comment