Tuesday, 17 June 2014

आजचा दिनविशेष

गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी
 
गोपाळ गणेश आगरकर  (१८५६-१८९५) -
 महाराष्ट्रीय लेखक व समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म सन १८५६ सालीं झाला.  गृहस्थिति अगदीं गरिबीची असल्यामुळें आपल्या आप्तांच्या आश्रयानेंच यांनीं रत्नागिरीस व वऱ्हाडांत विद्याभ्यास केला. सन १८७५ सालीं म्याट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन हे डेक्कन कॉलेजांत आले.
त्यांच्या पुढील परीक्षा सारख्या उतरत गेल्या व सन १८७९ सालीं त्यांस दक्षिणाफेलोची जागा मिळाली. या सालच्या सप्टेंबर महिन्यांतच स्वतंत्र शाळा आणि कॉलेज काढण्याचा विचार ठरविण्यांत आला. पण या सालीं यांची एम.ए. ची परीक्षा न उतरल्यामुळें आखणी एक वर्ष कॉलेजांत राहून सान १८८० साली एम.ए.ची परीक्षा पास झाल्यांवर हे ''न्यू इंग्लिंश स्कूल'' च्या मंडळींत येऊन काम करूं लागले. शाळेंत व कॉलेजांत असतांच यांस मराठींत लिहिण्याचा नाद असे, व डेक्कन कॉलेज संमेलनाकडून एका मराठी निबंधाबद्दल यांस बक्षीसहि मिळालें होतें. यांच्या मनाच्या प्रवृत्तीस अनुकूल असें इतर समवृत्तीच्या स्नेह्यांचे प्रोत्साहन मिळाल्यावर त्यांनीं मोठ्या हैसेनें व आनंदानें विद्याप्रसाराच्या कामीं आपलें आयुष्य खर्च करण्याचा निश्चय केला. तो त्यांचा निश्चय शेवटपर्यंत ढळला नाहीं. कोलेजांत असतांनां यांचा विषय इतिहास हा होता. त्याच्या अध्ययनानें ह्यांच्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ति उत्तरोत्तर दृढ होत गेली. न्यू इंग्लिश स्कूलमध्यें आल्यानंतर त्याच सालीं केसरी व मराठा हीं दोन पत्रें काढण्यांचे ठरून त्यांपैकीं केसरीच्या संपादकाचें काम यांजकडे देण्यांत आलें. आगरकरांचा व त्यांच्या मित्रांचा मुख्य उद्दिष्ट कार्याखेरीज इतर बाबतींत पहिल्यापासूनच थोडा मतभेद होता. परंतु १८८८ सालापर्यंत तो विशेष रीतीनें व्यक्त करण्याची कोणासहि आवश्यकता दिसली नाहीं. या सालच्या सुमारास डेक्कन एज्युकेशन सोसायटींत व अन्यत्र  ज्या कांहीं गोष्टी घडून आल्या त्यांमुळें केसरी आणि सुधारक अशीं दोन पत्रें करावीं लागलीं. ''कोणताहि हातीं घेतलेला विषय मार्मिक आणि जोरदार रीतीनें प्रतिपादन करण्याची यांची शैली त्यांच्या लेखांवरून चांगली व्यक्त होते. केसरीस सघ्यांची स्थिति येण्यास गोपाळराव हे पुष्कळ अंशीं कारणीभूत झाले होते. इतकेंच नव्हे तर केसरीचे संपादक याच नात्यानें त्यांचा व महाराष्ट्रांतील लोकांचा काहीं वर्षें परिचय होऊन तो संबंध कोल्हापूर प्रकरणानें अधिक दृढ झालेला होता. देशी वर्तमानपत्रांस जर कांहीं महत्त्व आलें असलें तर तें बऱ्याच अंशीं आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचें व मार्मिक लेखांचें फळ होय,'' असे उद्गार केसरीनें यांच्या मृत्युलेकांत काढले आहेत. शाळा व कॉलेज यांचें काम करून राहिलेला वेळ पंधरा वर्षेपर्यंत, तापासून म्हणण्यासारखी काहीं किफायत नसतां, त्यांनीं वर्तमानपत्रें चालविण्यांत घालविला. यावरून मराठी भाषेच्या द्वारें आपले विचार लोकांपुढें मांडून त्यांस एक प्रकारची शिक्षण देण्याची आगरकरांची उत्कृष्ट इच्छा व हौस पूर्णपणें व्यक्त होते. त्यांस दम्याची विकृति पहिल्यापासूनच होती; त्यामुळें त्यांच्या शरीराची काठी मजबूत असतांहि शेवटचीं १०।१२ वर्षे ते सतत थोडेबहुत आजारी होते. त्यांनीं औषधोपचार अतिशय केले पण त्यांपासून कांहीं गुण आली नाहीं; व शेवटीं एक दोन वर्षें तर त्यांची प्रकृति पुष्कळ थकली होती. शेवटी शेवटीं त्यांच्या यकृतासहि विकार होऊन त्यामुळें पायास सूज आली व अखेरीस उदर होऊन त्यांस १७ जून १८९५ रोजीं सकाळी देवाज्ञा झाली.
'सुधारक' पत्रांतील लेखांखेरीज आगरकरांनीं लिहिलेलीं दोन ती पुस्तकें आहेत. 'आमचे डोंगरातीलं १०१ दिवस.' यात डोंगरी तुरुंगांतील अनुभव व विचार प्रकट केले आहेत. शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाचें भाषांतर 'विकारविलसित' नांवांचें केलेलें आहे. त्या पुस्तकाच्या योग्यतेसंबंधानें बराच मतभेद होईल. हॅमलेटचें पात्रच रंगवितांना भाषांतरकारानें अनभिज्ञता दाखविली आहे. पुष्कळांना अपरिचित असणारें त्याचें आखणी एक पुस्तक व्याकरणांतील वाक्यमीमांसेबंबंधीं आहे.  ''केसरींतील निवडक निबंध''  या ग्रंथद्वयांत आगरकरांनीं लिहिलेले बरेच लेख आहेत. ते त्यांनीं केसरीचे संपादक असतांना लिहिले. सुधारकांतले त्यांचे लेखहि प्रसिद्ध झालेले आहेत. महाराष्ट्रीय मध्यम वर्गाचा आयुष्यक्रम आर्थिक कारणांनीं बदलत चालला तेव्हां नवीन परिस्थित्यनुरूप अशा आयुष्यक्रमाचें सर्मथन यांनीं केलें. यामुळें  ''सुधारक''  नांवाचा वर्ग यांस आपला तत्ववेत्ता समजत असे.
(http://ketkardnyankosh.com वरून साभार)

No comments:

Post a Comment