Sunday 25 September 2016

इयत्ता : ४ थी 
विषय : मराठी 
कविता या भारतात...
कवी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Monday 5 September 2016

उद्याची स्किल्स...



- मुकुंद नाडगौडा

मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 - 02:15 AM IST


प्रगत तंत्रज्ञान आपल्या खिशात
मिटींग संपवून बाहेर पडलो होतो. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर खिशातून मोबाईल काढला, ‘ओला‘ चे अॅप उघडले, जीपीएस ऑन केला, माझे सध्याचे लोकेशन ठरवण्यासाठी इकडे-तिकडे नजर फिरवली. नेमके लोकेशन कळले नाही, पण त्या निमित्ताने अनेक मनोरंजक होर्डिंग्ज वाचावयास मिळाली. एवढे होईपर्यंत मोबाईल स्क्रीनवरचा मॅप स्वतःला अॅडजस्ट करत होता. अंमळ डावीकडे-उजवीकडे करत-करत त्याने मला अचूक लोकेशन दाखवले. मग मी “बुक नाऊ” बटन टॅप केले आणि पुढील यादीतून माझे इच्छित स्थळही टॅप केले. त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत गाडीचा नंबर, ड्रायव्हरचे नाव आणि त्याचा फोटो मोबाईलच्या स्क्रीनवर आला. तो तीन मिनिटांत माझ्यापर्यंत पोहोचेल हेही समजले. दिलेल्या वेळेत गाडी आली. ड्रायव्हरला अॅपमधून इच्छित स्थळ कळलेच होते. तो मला रस्ता विचारात नव्हता, तर त्याच्या स्क्रीनवरील दिशादर्शकातील सूचनांनुसार गाडी चालवत होता. माहिती तंत्रज्ञानाच्या आगामी काळातल्या वाटचालीची ही एक छोटीशी झलक होती. यानिमित्ताने भविष्यकाळातील विविध रोजगारांचे स्वरूप आणि त्यांकरिता अत्यावश्यक असणारी काही मुलभूत कौशल्ये कशी असतील, यावर भाष्य करणे आवश्यक वाटू लागले. 
परिवर्तनाला प्रेरक व पोषक ठरणारे घटक
उद्याच्या विश्वात जी तांत्रिक आणि सामाजिक परिवर्तने अपेक्षित आहेत, त्या परिवर्तनांना प्रेरक आणि पोषक ठरणारे काही घटक आपल्याला पहायचे आहेत. ते घटक कोणते?

वाढते आयुष्यमान: गेल्या काही दशकांतील तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मनुष्याचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे. त्यामुळे स्वतःच्या शारीरिक सक्षमतेकडे लक्ष देणारा आणि निवृत्तीनंतरही कार्यरत राहणारा ज्येष्ठ नागरिकांचा एक नवा वर्ग उदयाला आलेला आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि  कौशल्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे निकडीचे आहे. त्या दिशेने संबंधितांनी नवनवीन तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. 

नवनवीन तंत्रज्ञान आणि साधनांचे अविष्कार: आपले कार्यालय, कारखाना, घर आणि एकंदरच संपूर्ण दैनंदिन जीवन भावी काळात आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एव्हढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाने व्यापून गेलेले दिसणार आहे. आपल्या रोजचे कामांचा मोठा भाग ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ असलेली अनेक साधने व उपकरणे नियंत्रित करणार आहेत. विविध स्वयंचलित साधने आपली उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणार आहेत. गेल्या आठ-दहा वर्षातला मोबाईल्स आणि संगणकांचा प्रवास पाहिल्यास यातील सत्यता पटेल.  

जगाचे “इलेक्ट्रॉनिक” परिवर्तन: गेल्या काही वर्षातील दूरसंचार क्रांती आता केवळ दूरध्वनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज आपण एकाच मोबाईल संचाचा उपयोग संभाषण, संदेशवहन, ई-पत्रांची देवाण-घेवाण, छायाचित्रण, चलचित्रण, मनोरंजन, माहितीची साठवण,  फेसबुक किंवा ट्विटर सारखे सोशल मिडिया, व्हिडियो चॅटींग, इत्यादी अनेक कामांसाठी करत आहोत. पुढे जाऊन तिची आणखी व्याप्ती वाढणार आहे आणि याच साधनांचा उपयोग दूरशिक्षण व ई-शिक्षण, दूरनियंत्रणाद्वारे आपली अन्य उपकरणे यशस्वीपणे वापरणे, अश्या अनेक अभिनव उद्देशांकारिता केला जाईल. थोडक्यात, मानवी बुद्धी आणि ही साधने व इतर यंत्रे या सर्वांचा एक अभूतपूर्व संयोग झालेला दिसणार आहे. आणि यातून मनुष्य जीवनाची असंख्य परिमाणेच बदलून जाणार आहेत.

जवळ येत चाललेले जग: जागतिकीकरणाच्या या युगात जग तंत्रज्ञानामुळे ख-या अर्थाने जवळ आले आहे. भौगोलिक कक्षा कायम राहणार असल्या तरी, व्यावसायिक व सेवा क्षेत्राच्या कक्षा दिवसेंदिवस जवळ येत आहेत. संपर्काची सहज उपलब्ध साधने आणि सोशल मिडियाचा वाढता वापर आज प्रत्येकाला “कनेक्ट” करत आहे. जागतिकीकरणाचाच एक थेट परिणाम म्हणून व्यवसायाचे व उद्योगाचे नवे मार्ग अस्तित्वात आले आहेत. उदाहरणार्थ, बी.पी.ओ., के.पी.ओ., सेवा क्षेत्र, बँकिंग, विमा, आरोग्यसेवा, इत्यादी. यांमधील विस्तारीत क्षितिजांना आणि स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जायचे असेल तर तांत्रिक, भाषिक आणि अन्य वैश्विक कौशल्ये पुढील पिढीने आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच हा प्रवास “लोकल टू ग्लोबल” असा होणे अपेक्षित असेल, कारण अवघे जगच “ग्लोबल टू लोकल” होत चालले आहे. 

उद्याची नवकौशल्ये 
उपलब्ध माहितीचे आकलन व विश्लेषण करण्याची क्षमता: तंत्रज्ञान व उपकरणे कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी बुद्धिमत्तेचे स्थान घेऊ शकत नाहीत. ती मानवी नियंत्रणाशिवाय कार्य करू शकत नाहीत. माहितीच्या क्रांतीच्या युगात इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांवरील अब्जावधी पृष्ठे उपलब्ध आहेत. गुगलद्वारे शोधायला गेल्यास त्यातील लक्षावधी पृष्ठांच्या लिंक्स आपल्याला सापडतात. त्यांपैकी आपल्याला हवा असलेला नेमका मजकूर कमीत-कमी वेळात मिळवण्याले कौशल्य मानवामध्येच असणे क्रमप्राप्त आहे. आणि मिळालेल्या माहितीचा परिणामकारक उपयोग करण्याची क्षमताही मानवाचीच असेल. हे सर्व पाहता, माहितीचे आकलन व विश्लेषण करण्याची क्षमता अंगीकारणे आणि वाढवणे सर्व संबंधितांस आवश्यक होणार आहे.

सामाजिक संवेदनशीलता: सामाजिक जाणीवा बोथट होत चालल्याचे सर्वत्र निदर्शनास येते. आपल्या सभोवताली यंत्रे आणि उपकरणे आहेत, याचा अर्थ आपण त्यांच्याइतकेच संवेदनाशून्य व्हावे असा नाही. जागतिक पातळीवर यशस्वीरीत्या अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता आणि इतरांशी भावनिक पातळीवरून समर्थपणे जोडले जाण्याकरिता भावी पिढ्यांनी सामाजिक संवेदनशीलता जतन व संवर्धन करण्यावाचून पर्याय नसेल. 

अभिनव व अनुकूल विचारसरणी:  नव्याने अंगीकारलेले जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यांमुळे नवनवीन समस्या व प्रश्न उभे रहात असतात. अशा प्रसंगी अनपेक्षित परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या समस्यांवर आणि प्रश्नांवर प्रस्थापित चौकटीच्या व चाकोरीच्या बाहेरचा विचार करून अभिनव पद्धतीने उत्तरे शोधण्याचे कसब आत्यंतिक महत्वाचे राहील. पारंपारिक पद्धतीने विचार आणि कृती करणा-यांना या नव्या युगात स्थान असेल की नाही याबद्दल शंका येते.

सामाजिक व सांस्कृतिक वैविध्याचा स्वीकार करणारी मानसिकता: जागतिकीकरणामुळे व तंत्रज्ञानाने जग जवळ येत चालले असले तरी त्यातील सामाजिक व सांस्कृतिक वैविध्य टिकून राहणार आहे. या वैविध्यास आनंदाने स्वीकारणे व त्याचा आदर करणे जरुरीचे आहे. आपण अशा वैविध्यपूर्ण समूहांमध्येच कार्यरत असणार आहोत. या समूहांतील प्रत्येक घटकांच्या वेगळेपणाचा व वैशिष्ठ्यांचा योग्य तो सन्मान करून देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी व उन्नतीसाठी या सर्वांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे, व त्यायोगे त्यांचे योगदान प्राप्त करून घेणे अत्यावश्यक राहील. विषमतेने व संकुचित मनोवृत्तीने उभ्या केलेल्या विविध भिंती पाडून टाकण्यावाचून पर्याय राहणार नाही.  जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर याशिवाय गत्यंतर नाही. नव्वदच्या दशकामध्ये तत्कालीन पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे विलीनीकरण बर्लिनची भिंत पाडून झाले, हे या मुद्द्याचे समर्पक उदाहरण आहे. 

नव माध्यमांविषयीची साक्षरता: इंटरनेटने आणि सोशल मिडीयाने अनेक नव्या माध्यमांना जन्म दिला आहे. भावी पिढ्यांना या नव्या माध्यमांचा दैनंदिन उपयोग करून घ्यावा लागणार आहे. त्याकरिता या नव माध्यमांविषयीची साक्षरता विकसित करावी लागेल. वर्तमानपत्रांचे, मासिकांचे, व पुस्तकांचे दिवस मागे पडून ई-पेपरचे, ई-बुक्सचे, पोडकास्ट्सचे, ब्लॉग्जचे  आणि युट्यूबचे युग आलेच आहे, ते आणखी विस्तारणार आहे. वर्गातला फळा जाऊन त्याची जागा प्रॉजेक्टरने कधीच घेतली आहे. आता तीच प्रेझेंटेशन्स मोबाईलवर व टॅब्जवर दिसणे अपेक्षित होत चालले आहे. या वाढत्या व बदलत्या मागण्या पुरवायच्या असतील तर सर्वांनी माध्यम-साक्षर होणे गरजेचे राहील.

बहुविध कौशल्यांचा अंगीकार: आगामी काळातील कर्मचारी आणि कामगार हे स्वतःच्या स्वतःच्या विषयात व क्षेत्रात पारंगत असणे तर गरजेचे असेलच, पण त्याचबरोबर त्यांना इतरही अनुषंगिक विषयांत पुरेशी गती असणे अपेक्षित असेल. याकरिता चौकस बुद्धी, संशोधक वृत्ती, आणि पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जाणारी जिज्ञासू वृत्ती, हे गुण असणे आवश्यक राहील. वर उल्लेख केल्याप्रमाणे, वाढत्या आयुर्मानामुळे निवृत्ती नंतरही आपल्या आवडीच्या, भिन्न क्षेत्रात कार्यरत असणे स्वाभाविक असणार आहे. त्याकरिता अशा प्रकारची बहुविध कौशल्ये सर्वांना, सर्वत्र, सर्वकाळ उपयोगी पडणार आहेत.

सारांश काय, तर ही किमान कौशल्ये अंगी नसलेल्या व्यक्तींना या बदलत्या जगात काही स्थान राहणार नाही, असेच दिसते. असे लोक मुख्य प्रवाहातून बाजूस फेकले जाण्याची शक्यता दाट असेल.  कौशल्यवृद्धीच्या व क्षमता बांधणीच्या या दिशेने शासन यंत्रणा, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी व तांत्रिक विद्यालये, शिक्षण संस्था, अशा सर्वच पातळ्यांवरून ठोस कृती होणे आवश्यक आहे. याशिवाय, वैयक्तिक पातळीवरूनही सर्व संबंधितांनी कसोशीने प्रयत्न करून स्वतःला उद्याच्या उन्नत तंत्रज्ञानाच्या अवलंबाकरिता सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. केंद्र व राज्यातील शासनही या दिशेने आवश्यक ती पावले उचलत आहेत, उदाहरणार्थ स्कील डेव्हलपमेंट, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, इत्यादी. पण या प्रयत्नांना समस्तांनी साथ देणे आवश्यक आहे, तरच अपेक्षित परिणाम हाती लागू शकतील. 

आपण सर्व उत्क्रांतीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत. हा संक्रमणाचा काळ आहे. त्याकरिता योग्य ती पावले उचललीच पाहिजेत, आणि आत्ताच उचलली पाहिजेत. अन्यथा आपण कालबाह्य होण्याचा धोका आहे.