आजचा सुविचार
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
आजची बोधकथा
'नवा श्लोक ऎकविणार्या कवीला एक हजार
सुवर्ण मोहोरा इनाम' हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका
विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राम्हणाच्या कानी गेले. तो
माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठया उत्साहाने आला.
परंतू राजधानी
आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन, तो
कालीदासाकडे गेला व त्याला म्हणाला, 'कवीराज ! मी भोजमहाराजांचे आव्हान
स्वीकारण्याच्या हेतूनं, त्यांना ऎकविण्यासाठी एक श्लोक घेऊन मुद्दाम
मणिपूरहून इथे आलो आहे. परंतू इथे आल्यावर मला असं कळल की, भोजराजांच्या
राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला, तरी दरबारात
असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवितो. त्याच्यानंतर
द्विपाठी पंडित त्याचापुनरुच्चार करतो. शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक
जसाच्या तसा म्हणून दाखविल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात,
'ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील तीन पंडितांनी जसाच्या
तशा म्हणून दाखविला, त्या अर्थी तो जुना आहे सिध्दच होते, ' तेव्हा कवीराज
! दरबारात नवा श्लोक घेऊन येणार्यांना असेच जर बनवून परत पाठविले जात
असेल, तर मी तरी तिथे कशाला जाऊ?'
कालीदासाने त्या ब्राम्हणाला एक
युक्ती सांगितली. त्याप्रमाणॆ त्याने एक नवा श्लोक रचला व भोज राजाच्या
दरबारात जाऊन ऎकविला. त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडिल अत्यंत
दानशूर. अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला.
त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून एक लाख सुवर्ण मोहोरा कर्जाऊ
घेतल्या. परंतू कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यु आल्याने,
भोज महाराज माझे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागतात.'
'हा श्लोक नविन
नाही' असं म्हणावं, तर आपले वडिल या ब्राम्हणांच्या वडिलांचे एक लाख सुवर्ण
मोहोरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहोरा याला
द्याव्या लागतील; त्यापेक्षा 'हा श्लोक एकदम नविन आहे.' असे म्हणणे
पत्करले,' असा विचार करुन भोज राजाने त्या ब्राम्हणाचे नवीन श्लोक
ऎकविल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन
वाटेला लावले.