आजचा सुविचार
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
आजची बोधकथा
एक
पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला,"महाराज ! मी आवाहन करतो कि
या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे. जर मी जिंकलो तर मला हजार
होन द्यावे आणि मी हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहीन." राजाने ते आवाहन
स्वीकारले. वादसभा सुरु झाली, पंडित हा त्या राजाच्या जनतेपेक्षा खूप
हुशार निघाला. त्याने सर्वाना हरविले. आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होन
देण्याची
वेळ आली तेंव्हा राजा म्हणाला,"पंडितजी! तुम्ही मला कुठे हरविले आहे? " हे
ऐकताच पंडित म्हणाला,"महाराज! आपण राजे, मी आपल्याला कसा काय हरविणार?"
राजा म्हणाला,"अहो! मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे. तुम्ही
माझ्याशी बुद्धिबळ खेळा, जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होन मी देईन आणि मी
जिंकलो तर तुमचा शिरच्छेद करेन." पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला त्याला
बुद्धिबळ खेळता येत नव्हते. पंडित म्हणाला,"महाराज, मला आपल्याइतकं चांगलं
बुद्धिबळ खेळता येणार नाही, तेंव्हा मी मरणार हे निश्चित आहे. तेंव्हा
माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेंव्हा मरण्यापूर्वी माझ्या
कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो." राजा
म्हणाला,"किती पाहिजे तितके मागा देतो!" पंडित म्हणाला," महाराज! पण तांदूळ
देताना मला असे द्या कि या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या. म्हणजे
पहिल्या घरात जर एक दाणा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने
तांदळाची संख्या वाढवून मला द्या." राजाला हे सोपे वाटले त्याने ते मान्य
केले. राजाला गणित लक्षात आलं नाही. बुद्धिबळाच्या बत्तिसाव्या घरात
जेंव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेंव्हा तांदळाची संख्या झाली होती २१४
कोटी. हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिता करावा लागणार होता. हे पाहून
राजाने पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने बोळवण केली.
तात्पर्य-
बुद्धीचातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते.