Saturday 26 October 2013

आजचा सुविचार

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

आजची बोधकथा

मुल्ला नसिरुद्दीन रात्री जंगलातून जात होते. अचानक गूढ आवाज त्यांच्या कानी पडला. हा भूताखेताचा प्रकार असावा असे वाटून ते घाबरले. त्यांनी हळूच मागे पाहिले तर गुहेत बसलेला एक मनुष्य त्यांना दिसला, मुल्लांनी विचारले ,"कोण आहेस तू?" तो म्हणाला," मी एक फकीर आहे. इथे बसून साधना करतोय." घाबरलेल्या मुल्लांनी रात्र गुहेत घालविण्यासाठी फकिराकडे परवानगी मागितली व ती त्यांनी दिली. थोड्या वेळाने मुल्लांनी फकिराकडे पिण्यासाठी पाणी मागितले, फकिराने एक भांडे देवून नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. मुल्ला म्हणाले,"मी खूप घाबरलोय! " तेंव्हा फकिराने स्वतः पाणी आणण्यास जातो म्हणाला. तर मुल्ला पुन्हा म्हणाले,"तुम्ही गेल्यावर मला येथे भीती वाटेल." हे ऐकताच फकिराने कट्यार काढून दिली. फकीर पाणी घेवून परतला तर मुल्ला मोठ्यानी ओरडू लागले,"खबरदार! जर पुढे आलास तर मारून टाकीन !" फकिराने आपली ओळख सांगितली. तर मुल्ला म्हणाला,"कशावरून तू भूत पिशाच्च नाहीस !फकिराचे रूप घेवून भूत पिशाच्च येवू शकते." वैतागून फकीर म्हणाला,"अरे मीच तुला माझ्या गुहेत आश्रय दिला आणि मलाच तू आत येवू देत नाहीस. असली कसली रे बाबा तुझी भीती !" मुल्लाने काही त्या फकिराला रात्रभर गुहेत येऊ दिले नाही. फकीर बिचारा रात्रभर गुहेबाहेर थांबला. सकाळी मुल्ला उठले व जाऊ लागले. जाताना फकिराला म्हणाले,"भाई ! मला माफ करा ! पण भीती अनेकदा माणसाला विवेक सोडायला भाग पाडते. त्यावेळी तो उपकारकर्त्यालासुद्धा विसरतो."

तात्पर्य-

 भीतीमुळे माणूस काही वेळेला विवेक गमावतो आणि उपकारकर्त्याला विसरतो, त्याचे उपकार विसरून जातो.