आजचा सुविचार
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
आजची बोधकथा
अंबाप्रसाद
नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना दोन मुलगे होते. एकाचे नाव होते लक्ष्मिधर
आणि दुसऱ्याचे भूपाल. लक्ष्मिधरला नावाप्रमाणेच संपत्तीची हाव होती तर
भूपाल हा भूमातेची सेवा करण्यात धन्यता मनात असे. अंबाप्रसाद हे आता वृद्ध
झाले होते. त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरविले, राहता वाडा
त्यांनी एका शाळेसाठी देवून टाकला. दोन्ही मुलांसाठी त्यांनी दोन पर्याय
तयार केले होते. एका बाजूला हंडाभर मोहोरा आणि एका बाजूला माळरान जमीन आणि
तीन पोती बियाणे. मग त्यांनी दोन्ही मुलांना बोलावले आणि सांगितले. ह्या
दोन गोष्टीपैकी एकाची निवड करण्यास सांगितले, लक्ष्मिधरने विचार केला,
माळरान आणि बियाणे घेवून शेती कुठे करत बसणार त्यापेक्षा आपण मोहोरांचा
हंडा घेवू आणि त्या पैशाने वाडा विकत घेवून आयुष्यभर सुखात राहू. त्याने तो
पर्याय स्वीकारताच भूपालाकडे दुसरा पर्याय नव्हताच. त्याने आनंदाने आपल्या
वडिलांची ती देणगी स्वीकारली. अंबाप्रसादांचे काही दिवसातच निधन झाले.
त्यांच्यानंतर ठरल्याप्रमाणे वाटण्या झाल्या. लक्ष्मिधरने नवीन घर घेतलं.
तो चैनीत राहू लागला. भूपाल मात्र माळरान जमीन कसण्यासाठी तयार झाला.
त्याने ती जमीन नांगरली, खूप कष्ट घेतले, मशागत केली, वडिलांकडून मिळालेलं
बियाणे पेरले. जमीन चांगली होतीच पण कसलेली नसल्याने माळरान झाली होती.
जमीन पिकाने बहरली, शेतं डोलू लागली, सुगी झाली आणि भूपालचे घर म्हणजे
धान्याचे कोठार झाले, लक्ष्मिधर मात्र संपत्ती उधळत होता आणि मोहोरा संपवून दरिद्री होत होता. भूपाल मात्र सुखाने राहू लागला. वडिलांची देणगी त्याला समजली होती.
तात्पर्य -
केवळ संपत्तीपेक्षा श्रमाचं धन उपयोगी येतं. श्रम हे मानवाला संपत्ती मिळवून देतात हेच खरे.
तात्पर्य -
केवळ संपत्तीपेक्षा श्रमाचं धन उपयोगी येतं. श्रम हे मानवाला संपत्ती मिळवून देतात हेच खरे.