Sunday 17 November 2013

आजचा सुविचार

दुसर्‍यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

आजची बोधकथा

एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. रात्रंदिवस तो या धनाची वाढ कशी होईल याचा विचार करीत असे. आपल्या या अपार संपत्तीची माहिती लोकांना तर होणार नाही याची त्याला काळजी व भीती वाटत असे. या हेतूने तो संत रोहीदासांकडे गेला आणि म्हणाला,"महाराज! आपण परमज्ञानी आहात. कृपया मला संपत्ती वाढविण्याचे रहस्य सांगा." संत रोहीदासानी त्याला शेंगाचे बी देत म्हणाले,"हे चमत्कारी बीज तू आपल्या घराच्या अंगणात लाव. तुझ्या धनाची वृद्धी निश्चित होईल." त्या श्रीमंताने प्रसन्न होवून ते बी आपल्या घराच्या अंगणात लावले. दोन तीन महिन्यात ते बी वेलीच्या रुपात सर्वत्र पसरले. आणि त्याला शेंगाचा बहर आला. मात्र त्याच्या संपत्तीत काही वाढ झाली नाही. तो परत रोहीदासांकडे जाऊन म्हणाला,"महाराज बी उगवले, वेल सर्वत्र पसरली, शेंगाचा बहर हि सुंदरपणे सुरु झाला पण माझ्या संपत्तीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वाढ झाली नाही." तेंव्हा संत म्हणाले,"अरे भाऊ! मी तुला ते बी भाजून खायला सांगितले असते आणि त्याने तुझे पोट भरेल असा दावा केला असता तर ते अशक्य होते. पण तू त्याचा योग्य वापर केला आहेस. आता ते एकटे बी तुझ्या एकट्याचे पोट न भरता अनेकांचे पोट भरेल इतके बी त्याने त्याने तयार केले आहे. अनेक लोक त्याची भाजी बनवून खातील अशाप्रकारे तुझ्या जवळची संपत्ती तू अशी गुंतव कि त्यात वृद्धी होईल. तिजोरीत ठेवण्याने संपत्ती कधीच वाढणार नाही. उलट चोरापासून तुला भीती वाटेल संपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग होणे गरजेचे आहे असे मला वाटते." श्रीमंताला योग्य मार्गदर्शन मिळाले व त्याप्रमाणे तो आयुष्यभर जगला. 


तात्पर्य-

संपत्तीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्यात वाढ होते. कष्टाने वाढविल्यास वाढते, आळसाने त्यात वाढ होत नाही.