आजचा सुविचार
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
आजची बोधकथा
एका
जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या
समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक
बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात
बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते
ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न
राहिल्याने आपल्या जमातीतील
प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना
एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या
शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे.
बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात
वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि
गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे
ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि
म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का
पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत
आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा
अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला
देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे
प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो.
पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात
राहायला जाते.
तात्पर्य-
स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला
जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.