Friday 29 November 2013

आजचा सुविचार
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
 आजची बोधकथा 
बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून
सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम

एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले.बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."
तात्पर्य-
दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.


No comments:

Post a Comment