Monday 11 November 2013

आझाद, मौलाना अबुलकलाम

            
११ नोव्हेंबर १८८८ रोजी अबुल कलाम आझाद यांचा जन्म मक्का येथे झाला. ते दोन वर्षाचे असताना त्यांच कुटुंब भारतात आल. मौलाना अबुल कलाम आझाद यांच मूळ नाव मोहिउद्दीन अहमद  होत. पण लेखक म्हणून त्यांनी अबुल कलाम आझाद हे टोपण नाव घेतल आणि त्यांची विद्वत्ता पाहून लोक त्यांना मौलाना म्हणू लागले.
            तीक्ष्ण बुद्धी आणि तीव्र स्मरणशक्ती  यांची देणगी  त्यांना लाभली होती. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत  अरबी, फारसी व उर्दू भाषांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. आधुनिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी इंग्रजी शिकणे आवश्यक आहे याची जाणीव झाल्यावर त्यांनी मग इंग्रजीमध्येही प्राविण्य मिळवले. इस्लाम धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, गणित, इतिहास, इत्यादि विषयात रुचि असणार्‍या आझादांना वाचनाची खूप आवड होती. त्यातूनच अवध्या सोळाव्या वर्षी त्यांनी 'लिसानुस्सिदक' नावाचे मासिक काढले होते. 'अल हिलाल' नावाच उर्दू साप्ताहिकही ते  चालवत होते. १९१४ मध्ये पहिल महायुद्ध सुरु झाल; तेव्हा त्यातील ब्रिटिश सरकार विरोधी लिखाणामुळे त्यांच्या अल हिलाल या साप्ताहिकावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. तेव्हा त्यांनी 'अल बलाग' नावाच दुसर साप्ताहिक सुरु केल.
            महात्मा गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आझादांवर पडला होता. ते गांधीजींच्या असहकार चळवळीत सामील झाले. राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि पुढे राष्ट्रीय एकात्मता हे त्यांच्या आयुष्याच ध्येयच  बनल. असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ यात ते अग्रभागी असत. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले. सन १९२३ मध्ये अवघ्या पस्तीसाव्या वर्षी आझाद काँग्रेसचे अध्यक्ष बनले; ते १९४६ पर्यंत. आपल्या या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हिंदू मुसलमान एकजूट बळकट करण्याच त्यांच कार्य चालूच होत.
            मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. शिक्षण हे राष्ट्रउभारणी व राष्ट्रीय विकासाला पूरक असले पाहिजे; विज्ञान व तंत्रज्ञानाला शिक्षणात अग्रक्रम दिला पाहिजे; याबाबत त्यांचे ठाम मत होते.
            मौलाना आझाद प्रतिभावंत साहित्यिकही होते. 'तर्जुमान - उल - कुरान' हे कुराणावरील भाष्य 'इंडिया विन्स फ्रिडम' आणि 'गुबार - खातीर' ही त्यांची पुस्तके खूप गाजली.
             २२ फेब्रुवारी १९५८ मध्ये त्यांचे निधन झाल.