Saturday, 9 November 2013

आजचा सुविचार

'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'

आजची बोधकथा

एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. एके दिवशी व्यापारी अटटहासाला पेटला तेंव्हा फरीद म्हणाले,"मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?" हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला.
इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला. संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला. शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले," मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग कि या ३९ दिवसात तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, " यालाच मरणाची भीती म्हणतात, कि रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे कि त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले. 
 
तात्पर्य- 
मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेंव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सदवर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते.

No comments:

Post a Comment