आजचा सुविचार
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
आजची बोधकथा
एका
शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही
शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी
विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील
सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व
त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी
चोरीची तक्रार
केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,"हि गाय तू
कुठून आणली आहे? " शेतकरी म्हणाला," हि गाय मी खरेदी केली आहे." पंचानी
कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर
पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच
शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने
पंचांना सांगितले," हि गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली
आहे." पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या
नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,''
ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या
क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा
पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य
ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे
कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.
तात्पर्य-
एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.